Ad will apear here
Next
दृश्यम-अदृश्यम
लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना अलीकडे वाढत आहेत. ज्येष्ठ गुजराती लेखक, पत्रकार प्रफुल शाह यांनी अपहरणाच्या एका सत्यघटनेवर आधारित असलेली ‘दृश्यम-अदृश्यम’ ही कादंबरी लिहिली असून, सदामंगल प्रकाशनानं त्याचा मराठी अनुवाद प्रसिद्ध केला आहे. त्या कादंबरीतलं हे एक प्रकरण...
..........
दिनांक - १३/०२/२०१७ 
सूर्यकांत भांडे-पाटीलची सकाळ नित्यक्रमाप्रमाणे वर्तमानपत्र व चहाच्या कपासह सुरू झाली. त्याची वेधक नजर बातम्यांच्या फैलावलेल्या पसाऱ्यातून कानाकोपऱ्यात दडलेल्या, कोणाच्या अधम वृत्तीच्या शिकार झालेल्या निरागस संकेतला शोधत होती. तो नव्या लहूला नजरकैद करून जेरबंद करण्यासाठी निश्चयी होता. थोडी दूर उभी असलेली प्रतिभा चहाचा कप शांतपणे हातात घेऊन त्याला पाहत उभी होती. आता चहाचा कप टीपॉयवर ठेवून निघून जाण्यापेक्षा तिला वाट पाहणं आवडू लागलं होतं. नवऱ्यानं एवढा मोठा सेवायज्ञ करायचं ठरवून टाकलं होतं, याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मग दोन-पाच मिनिटं चहाचा कप हातात घेऊन वाट पाहण्यात तिला काही वावगं वाटलं नाही. 

सूर्यकांतनं पेपर खाली ठेवला. ओठांवर एक नाजूक हास्य उमटलं. हुश्श्श... आज सगळी मुलं सुरक्षित आहेत. प्रतिभा चहाचा कप टीपॉयवर ठेवून त्याच्या शेजारी बसली. आता फक्त या मोहिमेतच नाही, तर वडिलांच्या व्यवसायाचा एक भाग झालेला सौरभही दोघांजवळ येऊन बसला. तिघांनी संकेतच्या फोटोकडे पाहून ‘गुड मॉर्निंग’ केलं. संपूर्ण घरात सकाळचं वातावरण सूर्यकिरणांनी उजळून निघालं. सकाळचा झुळुकता वारा पिंगा घालत होता. पानवेली आनंदानं डुलत होत्या. सुंदर सकाळ नवकिरणांची सोनेरी वस्त्रं लेऊन घरात आली होती. 

संकेतच्या निधनाचा शोक कायम हृदयाशी कवटाळून बसण्यापेक्षा एका नव्या दिशेला वाटचाल केल्याचा सूर्यकांतला आनंद होता. दु:खी होऊन कुढत बसलो नाही. पोलिसांवर दोषारोप करत राहिलो नाही. व्यवस्थेला जबाबदार ठरवून तोंड शिवून गप्प बसलो नाही, तर वेदनेला वज्रास्त्र, पिडेला प्रेरणास्त्र आणि स्वप्नांना ध्येय बनवलं. याचा त्याला अभिमान वाटत होता. 

सूर्यकांतला कुटुंबानं संपूर्ण साथ दिली. विचार स्पष्ट होते. स्वत: ज्या परिस्थितीतून तावून सुलाखून निघाला, ती परिस्थिती दुसऱ्या कोणावर बेतता कामा नये, हा एकमेव दृष्टिकोन समोर ठेवून सूर्यकांत पोलिसांना नेहमी मदत करतो आहे. संकेतच्या अपहरणानंतर कित्येक वर्षं त्यानं अनेक अपहरण घटनांचा बारीक अभ्यास केला. जिथं कुठं खंडणी किंवा अपहरणाची घटना घडते, तिथं तो स्वत: जाऊन तपास करतो. कधी पीडित कुटुंबं व्यवस्थित माहिती देत नाहीत किंवा अजाणतेपणे अपमान करतात. त्यांची मानसिक स्थिती लक्षात घेत परिस्थिती स्वीकारून सूर्यकांत स्वत:चे प्रयत्न सुरू ठेवतो. संकटात सापडलेली व्यक्ती किंवा कुटुंबीय परक्या व्यक्तीवर विश्वास ठेवणार नाहीत, हे सत्य स्वीकारून चालतो. अशा घटनांचा तपास तडीस नेण्यास मदत करतो. कार्यसिद्धीसाठी कोणाकडून कोणतीही अपेक्षा करत नाही. किंवा काळ-वेळेची आणि पैशांची तमा बाळगत नाही. एक-दोन घटनांमध्ये तर शोध घेण्यात स्वत:चे तीन-चार लाख खर्चही केले आहेत. लहान मुलांच्या अपहरण केसमध्ये तपासाचं मानधन घेणं तर विसराच, परंतु तपासासाठी येण्या-जाण्याचा खर्च किंवा चहापाण्याचा पाहुणचारही घेत नाही. 

सूर्यकांतला आता गुन्हेगार पकडून देण्यापेक्षा निर्दोष जीव वाचवल्याचा आनंद जास्त आहे. त्यानं आतापर्यंत गुन्हेगारीच्या पन्नासेक प्रकरणात पोलिसांना मदत केली आहे. त्याचा परमोच्च आनंद लहान मुलांच्या अपहरणकर्त्याला गजाआड करण्यात आहे. 

निवांत क्षणी संकेतची आठवण येते, तेव्हा प्रत्येक घटनेचा भूतकाळ नजरेसमोर तरळून जातो. आधी संकेत... नंतर अमित सोनावणे...

वर्ष २०००मध्ये महाराष्ट्रात सांगली जिल्हातल्या इस्लामपूर गावात हुपरी इथून सात वर्षांच्या ऋषिकुमार पिंपळगावकरचं अपहरण झालं. एक लाखाची खंडणी मागण्यात आली. उसाच्या मळ्यात ऋषिकुमारची हत्या झाली होती. पोलिसांकडून माहिती मिळवून सूर्यकांतनं तपास आरंभ केला. ऋषिकुमारचे वडील चांदी कारखान्याचे मालक होते. त्यांना तीन मजुरांवर शंका आली. सूर्यकांतनं त्यांना जेरबंद करण्यात मदत केली. आग्रावासी त्रिकूट जेलवासी झालं. 

सन २००३ मध्ये सासवड मुक्कामी बारा वर्षांचा ऋषिकेश माईनकर खंडणीच्या लालसेपायी अपहरण करून मारला गेला. विचित्र केस होती. आरोपी १६, १७, व १८ वर्षांचे होते. पोलिसांनी एक आरोपी पकडून फाइल बंद केली. परंतु सूर्यकांतनं पलायन झालेल्या दोन अल्पवयीन आरोपींना कोठडीत डांबण्यात यश मिळवलं. 

सन २००९मध्ये मुंबईत अंधेरीच्या साहिल अंकुश दळवीची शोकांतिका घडली. सन २०१०मध्ये पुणे-वाकड इथून सागर नवले गायब झाला. पोलिसांनी तपास केला. सूर्यकांतनं अथक मेहनत घेतली. सागर परत आला नाही, की त्याचा कोणताही पत्ता लागला नाही. ह्या घटनेचं शल्य अजूनही सूर्यकांतच्या हृदयात टोचत आहे. 

सन २०१०मध्ये हैदराबादला खंडणीच्या लालसेनं दीप पटेल अपहरणकांड घडलं. पटेल कनेक्शनमुळे हे सूर्यकांतला समजलं. दीप पटेलचे कुटुंबीय थेट हैदराबादहून पुण्याला आले. पुण्यातून सूर्यकांतनं दोन आरोपी पकडून द्यायला मदत केली. दीपच्या नशिबी मात्र चिरनिद्रा आली होती. 

सन २०१०मध्ये डोंबिवलीतील सात वर्षांच्या यश शाहला गायब करण्यात आलं. मृतदेह सापडला. एका पत्रकारामुळे बातमी सूर्यकांतकडे पोहोचली. सक्रिय सूर्यकांतनं दोन गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना मदत केली. 

सन २०११मध्ये झालेल्या मुंबईच्या कर्णीत शाह केसला सूर्यकांत कधीही विसरू शकणार नाही. ह्या केसमध्ये त्यानं जे यश मिळवलं आणि जी मदत केली, ती लक्षणीय होती. कर्णीत शाह केसमधील दीपक गुप्ता नावाच्या आरोपीची चौकशी नाशिकपासून सुरू करून थेट उत्तर प्रदेशपर्यंत झाली. त्याला शोधून काढताना सूर्यकांतनं पोलिसांना मदत केली. आरोपी दीपक गुप्ता पकडला गेला. सर्वांत मोठं यश हे होतं, की कर्णीत शाह जिवंत सापडला. इतक्या घटनांमध्ये एकटा कर्णीत शाह नशिबवान ठरला...

सूर्यकांतला एक गोष्ट व्यवस्थित समजली आहे आणि तोच ती सगळ्यांना समजावून सांगतो. लहान मुलं ही अपहरणकर्त्यांसाठी एकदम ‘सॉफ्ट टार्गेट’ असतात. कारण त्यांच्यावर भुरळ घालणं सहजसाध्य असतं. त्यांना त्वरित सहजपणे कुठेही उचलून नेता येतं. गरज पडल्यास अगदी सहजतेनं त्यांचा काटा काढला जाऊ शकतो. कारण त्यांच्यात प्रतिकार करण्याची शक्ती किंवा समज नसते. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं अपहरण करून खंडणी वसूल करण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. आरोपींना पकडणं गरजेचं आहेच. परंतु त्याला योग्य ती कायदेशीर शिक्षा होणंही अनिवार्य आहे. जर खंडणीबाज निर्दोष सुटला, तर त्याचा आत्मविश्वास आणि जोश वाढतो व दुसरा गुन्हा करण्यास तो प्रवृत्त होतो. ह्यासाठी खंडणीबाजाला सक्त शिक्षा होण्यासाठी शक्य असतील तेवढे पुरावे आणि माहिती मिळवून पोलिसांना दिली पाहिजे. आपली सगळ्यांची निरीक्षणशक्ती आणि श्रवणशक्ती वाढवली पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे जागरूकता हवी. 

सूर्यकांतचं शोधकार्य हा अविरत सुरू राहणारा सेवायज्ञ आहे. त्यामागे संकेतबद्दलचं अफाट प्रेम आहे. क्षणोक्षणी संकेतला वाहिली जाणारी स्मरणांजली आहे. स्वतःच्या अकथ्य वेदना नियतीच्या खोल डोहात डांबून ठेवत, परक्या लोकांच्या खुशीसाठी, आनंदासाठी, त्यांच्या जीवनबागेत डोलणारी सुगंधित फुलं उमलवण्याकरता हा ‘सिंहाचा छावा’ सतत प्रयत्नशील असतो. समाजात मिसळलेल्या, एकरूप झालेल्या अशा निधड्या छातीच्या ह्या मित्राला आपण साथ देऊ या. सतत त्याच्यासोबत राहून कित्येक गोजिरवाण्या बालकांच्या आयुष्याची राखण करू या. 

(‘दृश्यम-अदृश्यम’ ही प्रफुल शाह यांनी लिहिलेली कादंबरी ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZIMCH
Similar Posts
इंडस्ट्री 4.0 सध्याचं युग डिजिटल क्रांतीचं आहे. त्यामुळे दर वर्षी तंत्रज्ञानाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढत चालली आहे. याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘एक्स्पोनेन्शिअल’ तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक लिहिले आहे
चैतन्यस्पर्श ‘आपण सापाला घाबरतो, त्याच्या हजारपट जास्त तो आपल्याला भितो. आणि त्या भीतीपोटी तो जी डिफेन्स मेकॅनिझम वापरतो म्हणजे फणा उगारून फुत्कारतो त्याने आपण घाबरतो. आज मुक्काम कर, तुला उद्या बापूसाहेबांना भेटवतो...’ ‘कोण बापूसाहेब? योगी वगैरे आहेत का?’ ‘छे रे, बापूसाहेब म्हणजे एक भुजंग आहे.. जुना... नव्वद वर्षे वयाचा सर्प आहे
आर्थिक नियोजनाच्या पाच प्रमुख पायऱ्या कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे शेअर बाजारामुळे साध्य होऊ शकते. शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी सुभाष पांडे आणि रवींद्र पाटील यांनी ‘शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language